मुरबाड : पुण्याहून माळशेज घाटात (Malshej Ghat) पर्यटनासाठी आलेल्या एका २३ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डोंगरकड्यावरून कोसळलेला दगड थेट तरुणाच्या डोक्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (रविवारी, १५ सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत कुमार सिंग (वय 23) असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो ४८ पर्यटकांसोबत माळशेज घाटात फिरण्यासाठी आला होता. या ठिकाणी तो थीतबी परिसरात फिरत असताना अचानक डोंगरकड्यावरून काही मोठी दगडं खाली कोसळली. यातील एक मोठा दगड थेट हेमंतच्या डोक्यावर पडला. या घटनेत तो जागीच कोसळला.
सोबतच्या मित्रांनी त्याला तात्काळ मुरबाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर हेमंत सिंगच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, कमी वयात तरूणाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







