-संगीता कांबळे
पिंपरी : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आघाडीवर आहे. आतापर्यंत शहरातील 1 लाख 18 हजाराहून अधिक महिलांचे अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये 62 हजार 878 अधिक ऑनलाईन अर्जांचा समावेश झाला आहे. त्यात 55 हजार 508 ऑफलाईन अर्जांचा समावेश आहे. घरोघरी जावून ऑफलाईन अर्ज भरण्यामध्ये प्रकल्प सिद्धी उपक्रमातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांची महत्वाची भूमिका आहे.
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘प्रकल्प सिद्धी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत 300 महिला सदस्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शहरातील महिला लाभार्थींना मिळावा, यासाठी लाभार्थींच्या घरोघरी जावून त्यांना अर्ज भरण्यामध्ये मदत करण्याचे तसेच योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्याचे कामही करत आहेत. प्रकल्प सिद्धी उपक्रमाच्या समन्वयिका आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्या सोनाली परदेशी या सहकार्य करत आहेत.
योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यात पिंपरी चिंचवड महापालिका आघाडीवर
आत्तापर्यंत, पिंपरी चिंचवडकडे राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या तुलनेत लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. 62 हजार 878 ऑनलाईन आणि 55 हजार 508 ऑफलाईन असे सुमारे 1 लाख 18 हजारपेक्षा जास्त अर्ज महापालिकेस प्राप्त झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका सक्रियपणे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज भरण्यावर भर देत आहे.
योजनेसाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय सूक्ष्म नियोजन
– 8 क्षेत्रीय कार्यालयनिहाय 123 अर्जस्विकृती केंद्रांची स्थापना आणि 8 ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरणा केंद्रे
– 300 महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांद्वारे घरोघरी जावून ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया
– विविध ठिकाणांहून प्राप्त झालेले ऑफलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय 160 डेटा ऑपरेटरर्समध्ये 74 कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटची नियुक्ती
– डेटा एन्ट्रीसाठी सुमारे 361 आंगणवाडी सेविका कार्यरत
– लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्तरावर गोळा केलेल्या ऑफलाईन अर्जांचीही क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्विकृती
‘प्रकल्प सिद्धी’च्या महिला सदस्या पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कणा आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही या महिला बांधिलकीने काम करतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी त्या घेत आहेत. महापालिकेने आतापर्यंत गाठलेल्या या टप्प्याचे श्रेय महिला विकास महामंडळाच्या महिला, विभागीय समन्वयिका, अंगणवाडी सेविका आणि इतर योगदानकर्त्यांना जाते. हा टप्पा गाठण्यात त्यांचे सामूहिक प्रयत्न आणि वचनबद्धता महत्त्वपूर्ण ठरली असून त्यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका