पिंपरी चिंचवड : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २० लाख ६० हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार १२ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अलाइन्झ ग्लोबल इनवेस्टर, यूके कंपनी, कंपनी प्रतिनिधी विनोद कावले, प्रोफेसर अर्जुन कपूर आणि मीना पटेल या दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी विनोद यांच्यासोबत सोशल मिडियावरून ओळख झाली. ओळखीतून त्यांच्यात शेअर मार्केटबद्दल बोलणे झाले. त्यानंतर विनोद याने अर्जुन कपूर आणि मीना पटेल यांच्याशी फिर्यादी यांची ओळख करून दिली. त्यानंतर त्यांना शेअर मार्केट बद्दल माहिती सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता विविध कारणांसाठी आणखी रक्कम घेत त्यांची २० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.