पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर हे राज्याचे ग्रोथ इंजिन असून येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन निमित्त नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव येथे बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत 1 हजार 700 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, भूमीपूजन घेण्यात आले. तसेच ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची नगरी असून हे शहर चहुबाजूंनी वाढले आहे. पिंपरी चिंचवडकडे राज्याचे ग्रोथ इंजिन म्हणून पाहिले जाते. मुंबईप्रमाणेच हे शहर कोणाला उपाशी ठेवत नाही, निराश करत नाही. त्यामुळे मुंबई प्रमाणेच हे शहर म्हणजे ‘सिटी ऑफ होप’ आहे.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जास्त असल्याने या शहरात पायाभूत सुविधा देण्यासह शहर नियोजनबद्ध वाढले पाहिजे या दृष्टीकोनातून रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल आदी अनेक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
यावेळी प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली.