पिंपरी-चिंचवड: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. वाढती गुन्हेगारी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय समितीने (HPC) शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘एकात्मिक सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पा’ला हिरवा कंदील दाखवला आहे. हे कॅमेरे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित आहे.

पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी पार्क आणि चाकण-तळेगाव हा औद्योगिक पट्टा वेगाने विस्तारत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर होणारी आर्थिक उलाढाल आणि वाढती लोकसंख्या यामुळे पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण आहे. पारंपारिक यंत्रणेला मर्यादा येत असल्याने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी हा प्रकल्प आखला गेला आहे. या प्रकल्पात स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे जुने कॅमेरे नवीन यंत्रणेशी जोडले जातीलच, शिवाय संवेदनशील भागात नवे हाय-टेक कॅमेरेही बसवले जाणार आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हिंजवडी, भोसरी एमआयडीसी आणि चाकण परिसरावर या यंत्रणेची विशेष नजर असेल. यामुळे महिलांची सुरक्षितता आणि रस्ते अपघातांच्या वेळी तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे.







