पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसारत आर्थिक वादातून खून केल्याची घटना घडली आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून धारदार चाकूने सपासप वार करुन एका व्यक्तीचा निर्घुण खून केला. ही घटना चिंचवड येथील नागसेननगर झोपडपट्टी बिजलीनगर येथे १९ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
प्रकाश मारुती म्हेत्रे (वय-४०) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कमल किशोर भट (वय-४० रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, प्रकाश हा व्यसनांच्या आहारी गेला होता. तसेच सतत व्यसन केल्याने तो घरी जात नव्हता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि मयत प्रकाश यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरुन आपसात वाद झाला. त्यावेळी प्रकाश याने आरोपी कमल याला शिवीगाळ केली.
याच रागातून कमल याने धारदार चाकूने डाव्या पायाच्या मांडीवर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. जखमी प्रकाशला वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.