पिंपरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. वाकडमध्ये (Wakad) निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख रक्कम जप्त केलीय.मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे.
18 एप्रिलपासून मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे प्रचाराला वेग आलेला आहे.त्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.तसेच प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली असून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे.
वाकडमध्ये नाकाबंदी सुरु होती त्यावेळी मुंबईकडून वाकडच्या दिशेने एक चारचाकी मोटार येत होती. त्यावेळी पथकाने त्या मोटारीची तपासणी केली. मोटारीत रोकड दिसून आली. मोटारीतील व्यक्ती व्यावसायिक असल्याचे सांगत त्याला त्याच्याकडे असलेल्या रोख रकमेबाबत माहिती देता आली नसल्याने रोकड आणि मोटार जप्त करण्यात आली आहे.