पिंपरी-चिंचवड: शहरातील चिखली, कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना सहा दिवसांची मुदत महापालिका प्रशासनाने दिली होती. शनिवारी(८ फेब्रुवारी) सहा दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने दिवसभर कारवाई करत महापालिकेच्या अतिक्रमण विराेधी पथकाने पहिल्या दिवशी २२२ अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली, कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना सहा दिवसांची मुदत महापालिका प्रशासनाने दिली होती. आज शनिवारी(८ फेब्रुवारी) सहा दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने दिवसभर कारवाई केली. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे व महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या केली आहे.
या कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचिता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता हजर होते. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदशनात पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वात चिखली, कुदळवाडी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. पहाटे सहा वाजेच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली होती. २२२ अनधिकृत गोदामे, पत्राशेड व बांधकामे पाडण्यात आली आहेत. या वेळी पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तासह तीन अग्निशमन वाहने, दोन रुग्णवाहिका येथे तैनात करण्यात आल्या होत्या, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले आहे.