पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणीतून (सॅंडवीच) विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहूनगरच्या डी वाय पाटील स्कूलमध्ये आज गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी शहरातील शाहू नगरच्या डी वाय पाटील स्कूलमध्ये आज गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) फूड सेशनचे आयोजन केले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला दिली होती. ते खाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. ब्रेड आणि चटणी खाल्यानंतरच विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारखे वाटू लागले तर काही विद्यार्थ्यांनाा भोवळ आली.
या घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेमध्ये धाव घेतली. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले सॅंडवीच निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यांना त्रास झाला असल्याचा आरोप पालकांनी केला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खराब झाल्यामुळे रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना पाठवण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे डी वाय पाटील स्कूलच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. निकृष्ट अन्न खाऊ घालणा-या दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.