पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड परिसरात एका 30 वर्षीय पीएचडी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्गदर्शकाकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रास आणि गैरवर्तनाला कंटाळून विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 11 एप्रिल रोजी शाहूनगर येथे घडली. संबंधित विद्यार्थिनी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे बॉटनी विषयात पीएचडी करत होती. आरोपी डॉ. ए. बिन्नियमिन हा तिचा मार्गदर्शक (गाईड) होता.
आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये ऑगस्ट 2025 पासून आरोपी प्राध्यापकाकडून अनैतिक वर्तन, मानसिक छळ आणि गैरवर्तन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचेही तिने नमूद केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येच्या दोन दिवस आधी आरोपीने स्टॅम्प पेपरवर लेखी कबुली देत पुन्हा असा प्रकार करणार नसल्याचे लिहून दिले होते. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती आणि त्या धक्क्यातून ती सावरू शकली नाही, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉ. बिन्नियमिन याला अटक केली.
न्यायालयाने आरोपीला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ करत आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शक-विद्यार्थी नात्यातील विश्वास, तसेच संशोधन संस्थांमधील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.







