पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणून शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी रविवारी (दि.21 जुलै) स्वतःच्या राहत्या बंगल्याची स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राहत्या घरांची साफसफाई करत डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट केली. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ‘बीट डेंग्यू’ सूत्राचा अवलंब करावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःच्या राहत्या बंगल्याची स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही आपले आरोग्य ही आपलीच जबाबदारी समजून राहत्या घरांची साफसफाई केली असून नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी “बीट… pic.twitter.com/GzOQbCIXhN
— PCMC Smart Sarathi (@PCMCSarathi) July 21, 2024
पिंपरी-चिंचवड शहर डेंग्युमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘डेंग्युमुक्त पिंपरी-चिंचवड शहर’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांनी आठवड्यात एका दिवसातील एक तास आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्या राहत्या घराची स्वच्छता करायची आहे. या मोहिमेत सहभागी होत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरातील कुलर, फ्रीज, पाणी साठवणुकीची भांडी, झाडाच्या कुंड्या, घराच्या परस बागेची स्वच्छता केली आहे.
‘डेंग्युमुक्त पिंपरी- चिंचवड शहर म्हणजेच बीट डेंग्यू या मोहिमेत जागरूकता वाढवण्यासाठी आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि डेंग्यूला रोखणे हे महापालिकेचे उद्दिष्ट असून नागरी समुदायाच्या सहभाग वाढवण्यावर आणि आंतरविभागीय समन्वय राखण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा असून डेंग्यूला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे आहे, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
नागरिकांचे आरोग्य सुदृढ कसे ठेवता येईल यासाठी महापालिका सर्व प्रयत्न करत आहे. या मोहिमेत नागरिकांनी देखील सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘बीट डेंग्यू’ या संकल्पनेचा अवलंब करावा. तसेच आपले घर व परिसर स्वच्छ आणि कोरडे ठेवावे.
– आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका