पुणे : पीएमपीने महिलांसाठी मोफत बस प्रवासाची भेट देत गोड बातमी दिली होती. मात्र याचा गोडवा रेंगाळत असतानाच एक माहिती समोर आली आहे. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या ठेकेदारांच्या बसेसने अचानक ब्रेक घेतल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
पीएमपीकडे असलेल्या चार महत्वाच्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्याने पीएमपीच्या ताफ्यातील निम्म्या गाड्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर पीएमपीच्या बस नजरेस पडणे बंद झाल्याने प्रवाशांना वाट पाहावी लागत आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 142 बस आहेत. त्यापैकी 1100 बस ठेकेदारांच्या आहेत. तर पीएमपीच्या स्व:मालकीच्या 900 बस आहेत. पीएमपीचे बसगाड्या पुरवठा करणारे 2 ठेकेदार वगळता उर्वरित 4 ठेकेदारांनी रविवारी दुपारी 4 नंतर तीन महिन्याची बिले थकल्याने संप पुकारला. दुपार पाळीत त्यांनी प्रवासी वाहतुकीसाठी आपल्या गाड्या पाठविल्या नाहीत. त्यामुळे शहरातील थांब्यांवर प्रवाशांना गाडीसाठी तासनतास वाट पाहावी लागली.
ठेकेदारांची 90 कोटींती बिले थकली
ठेकेरांची बिले थकली आहेत. त्यांनी पंधरादिवसांपूर्वी बिलांची मागणी केली होती. मात्र, आज दुपारनंतर ठेकेदारांनी मार्गावर गाड्या पाठविल्या नाहीत. पीएमपीने त्यांना बस सोडण्याची विनंती केली. मात्र, ठेकेदारांनी गाड्या मार्गावर सोडण्यास नकार दिला आहे. सुमारे 90 कोटींच्या घरात ठेकेदारांची बिले थकली आहेत.
–ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल