पिंपरी : पिंपरी येथील हिंजवडी पार्कमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाड्याने रूम घेऊन ऑनलाइन जुगाराचा डाव आयटी पार्कमध्ये रागात होता. या प्रकारची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी डाव उधळला आहे. पोलिसांनी करावी करत ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी फेज १ येथे माण रस्त्यावरील हाॅटेल कॅपिटल डिलक्स लाॅज येथे शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही कारवाई केली.
रावसाहेब गजानन बनसोडे (२५, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ रा. सोलापूर), यश गंगाराम नाकनवरे (२१, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, मूळ रा. भीमा कोरेगाव, शिक्रापूर, जि. पुणे), प्रज्योत प्रकाश कुचेकर (२४, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ रा. सोलापूर), शुभम गणेश मोरे (२३, रा. पिंपळे गुरव), आशिष अशोक घटमल (२८, रा. बेबड ओहोळ, ता. मुळशी, मूळ रा. आंबेजोगाई, जि. बीड), आकाश संजय आडागळे (२४, रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव) यांना सीआरपीसी कलम ४१(१)(अ) प्रमाणे त्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे.
त्यांच्यासह तनीश गोयल आणि दीपाली गोयल (दोघेही रा. वल्लभनगर बस स्थानक जवळ, पिंपरी) यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दीपाली गाेयल आणि तिचा मुलगा तनीश गोयल यांनी हिंजवडी आयटी पार्क फेज १ येथे हाॅटेल कॅपिटल डिलक्स लाॅज येथे भाडेतत्त्वावर एक रूम घेतली होती. त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना लॅपटाॅप तसेच मोबाइलवरून काही ॲप्लिकेशन देण्यात आले होते. तसेच व्हाटसअप उपलब्ध करून दिले.
ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी अनेक जण व्हाटसअप क्रमांकावरून गोयल यांच्याकडील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत होते. यातून मोठी आर्थिक उलाढाल सुरू होती. यात लाॅजवर छापा मारला असता एका खोलीत सहा जण बेटिंग घेताना मिळून आले. तसेच सहा लॅपटाॅप आणि १५ मोबाइल असा एकूण पाच लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.