पिंपरी : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या २७ मार्च रोजी आहे. या सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देहूगाव येथे लाखो वारकरी, भाविक भक्त उपस्थित राहत असतात. यानिमित्त पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने तळवडे, महाळुंगे, चाकण विभागातील वाहतुकीत २५ ते २७ मार्च दरम्यान बदल केले आहेत. या काळात सर्व प्रकारांच्या वाहनांना देहूनगरीत प्रवेश बंद असणार आहे.
बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने देहूमध्ये येत असतात. त्यामुळे देहूगाव परिसरात वाहतूक कोंडी होत असते. त्यासाठी तळवडे, महाळुंगे, चाकण विभागातील वाहतुकीत २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते २७ मार्च रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तर देहूगाव मध्ये येण्यासाठी भाविकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे.
या मार्गाचा करा वापर
- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन देहूगाव कमान येथून जाणा-या सर्व वाहनांना तसेच महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सु कॉर्नर, कॅनबे, आयटी पार्क चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंद
- या मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल ते निघोजे, मोईफाटा मार्गे डायमंड चौकातून जातील.
- तळेगाव-चाकण रस्त्यावरुन देहूफाटा येथून देहूगावकडे जाता येणार नाही. या मार्गावरील वाहने एच.पी.चौकातून जातील.
- नाशिक-पुणे मार्गावरील चाकण, तळेगाव चौक, स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे कॅनबे चौकाकडे जाणा-या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद
- या मार्गावरील वाहने मोशी भारतमाता चौक, महिंद्रा सर्कल-इन्डुरन्स, एचपी चौक मार्गे जातील.
- देहू कमान ते १४ टाळकरी कमान, भैरवनाथ चौक, खंडेलवाल चौक ते देहूकमान, परंडवाल चौक हा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद
- जुना पालखी मार्ग ते झेंडे मळ्यामार्गे जाणारी वाहतूक एकदिशा मार्ग (वन-वे) असणार आहे.
- सार्वजनिक वाहतूक बस आणि दिंडीतील वाहने यातून वगळली आहेत.