पिंपरी-चिंचवड : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आणि नाक-तोंड दाबून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना १६ जून रोजी भाटे वस्ती, देहू-आळंदी रोड, तळवडे येथे घडली आहे. राणी देवी विशाल कुमार (वय-१९) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
विशाल कुमार जगत बहादुर (वय-२०, रा. भाटेवस्ती, देहू आळंदी रोड, तळवडे. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी देवी आणि विशाल कुमार हे दोघे भाटेवस्ती येथे राहण्यास आहेत. १६ जून रोजी सकाळी भाटेवस्ती येथे राणीदेवी या महिलेचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला देहू रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास करत असताना राणीदेवीचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून खून करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे पोलिसांनी पती विशाल कुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच खून केल्याची कबुली दिली. राणीदेवी हिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय विशाल कुमार याला होता. त्या संशयावरून त्याने राणीदेवी हिचा राहत्या घरात गळा व नाक-तोंड दाबून खून केल्याचे उघड झाले. पुढील तपास देहू रोड पोलीस करत आहेत.