पिंपरी : हातउसने घेतलेले पैसे परत न केल्याने एका मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोशी येथील शिवाजीवाडीमधील श्री साई फाॅर्च्यून राॅयल ग्रुप बांधकाम साईटवर रविवारी २१ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सत्यनारायण कर्ष (वय-३२) असं खून झालेल्या मजुराचे नाव आहे.
याप्रकरणी गजानंद किरीसिंग कर्ष (वय-३९, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सुरेंद्रकुमार व्यासनारायण कर्ष (वय -३२, रा. श्री. साई फाॅर्च्यून राॅयल ग्रुप बांधकाम साईट, लेबर कॅम्प, शिवाजीवाडी, मोशी) याला अटक करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानंद यांचा भाऊ सत्यनारायण कर्ष याने सुरेंद्रमुमार कर्ष याच्याकडून १ हजार रुपये हातउसने घेतले होते. दरम्यान, सत्यनारायण कर्ष, रुपेश साहू, गोलू साहू, प्रदीप कर्ष, अक्षयकुमार साहू हे रविवारी साई फाॅर्च्यून सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या डक्टजवळ प्लास्टर करत होते.
त्यावेळी सुरेंद्रकुमार याने सत्यनारायण कर्ष याच्यासोबत हातउसने पैशांवरून वाद घातला. तसेच रागाने त्याची काॅलर पकडून शिवीगाळ केली. मेरा पैसा अभीके अभी दो, नही तो मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, असं सुरेंद्रकुमार म्हणाला. यावेळी सत्यनारायण याला जोरजोरात धक्के देत पाठीमागील लिफ्टच्या अंदाजे ४० फूट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून दिले.
या घटनेत सत्यनारायण हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सुरेंद्रकुमार याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण पठारे करत आहेत.