पिंपरी : बहुप्रतिक्षित “इंद्रायणी थडी महोत्सव-२०२३” मध्ये प्रजासत्ताक दिनी सुट्टी असल्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत १० लाखहून अधिक प्रेक्षकांनी भेट दिली. त्यामुळे सुमारे १ कोटीहून अधिक उलाढाल झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणारा प्रतिसाद पाहता गेल्या दोन महोत्सवापेक्षा यंदाचा महोत्सव ‘रेकॉर्ड ब्रेक’ होईल, असा विश्वास शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता.२५) सायंकाळी “इंद्रायणी थडी- २०२३” महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल १ हजार महिला बचतगटांनी स्टॉल लावले आहेत. तसेच विविध मनोरंजन कार्यक्रम आणि बालजत्रा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली आहे.
बुधवारी सायंकाळी सुरू झालेला या महोत्सवात (ता. २६) जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळे मोठी गर्दी झालेली पहायला मिळाली. महोत्सवस्थळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारत माता की जय… वंदे मातरम्… च्या घोषणांनी महोत्सवाचा परिसर दणाणून सोडला.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, महिला बचत गटांची विविध खाद्य उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, जीवनावश्यक वस्तू असे विविध स्टॉल नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहेत. मनोरंजन, ऑटोमोबाईल, पर्यावरणपुरक उत्पादने, रोजगार मेळावा, विविध स्पर्धा, ग्राम संस्कृती, लहान मुलांसाठी खेळणी अशा सुमारे १५० निरनिराळे उपक्रम नागरिकांना मोफत पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळत असल्याने नागरिकांची झुंबड पहायला मिळत आहे. आयोजकांनी ‘फुटफॉल काउंटर’ यंत्रणा कार्यान्वित केली असून, त्याद्वारे गर्दीचे सुलभ व्यवस्थापन करण्यात येत आहे.
स्टॉलधारकांच्या अपेक्षा उंचावल्या…
स्टॉलधारकांना ‘इंद्रायणी थडी’ महोत्सवाचा मोठा फायदा होत आहे. महोत्सवाच्या सुरूवातीलाच १ कोटीहून अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. बचत गटांच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे नागरीक उत्पादने खरेदीला पसंती देत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून सुमारे २० हजार महिलांना व्यवसायाची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी चार दिवसांत आणखी गर्दी वाढणार असून, आर्थिकदृष्टीने चांगला फायदा होईल, अशी अपेक्षा स्टॉलधारक व्यक्त करत आहेत.