पुणे : पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ॲसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाला विशेष (पोक्सो) न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा आणि ३ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शुभम बाबू कुसाळकर असं शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून मुलावर गुन्हा दखल करण्यात आला होता. आरोपी आणि अल्पवयीन मुलगी हे दोघे एकाच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. आरोपी मुलगा हा कायम मुलीचा पाठलाग करायचा. पीडिता महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये जात असताना तिच्या हाताला धरून तरुणाने तिला ओढले.
वॉशरूमला जाताना ‘येऊ का’ अशी अश्लील टिप्पणी करीत, कुणाला काही सांगितले तर तुझ्या अंगावर ॲसिड फेकेन, अशी धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाला अटक करण्यात आली असून. न्यायालयाने तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.