पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून सराईत गुन्हेगार आणि टोळ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यात पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आणखी एक दणका देत भोसरी येथील जगताप टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आठ सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील 39 आरोपींवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आत्तापर्यंत 396 आरोपींवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (वय २२), सुनील राणोजी जावळे (२६, दोघेही रा. आदर्श नगर, मोशी), रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे (१९, रा. भोसरी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
भोसरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना जगताप टोळीच्या सदस्यांनी संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून गुन्हे केल्याचे समोर आले आहे. या टोळीतील आरोपीवर भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, हत्यार बाळगणे अशा गंभीर प्रकारचे १३ गुन्हे दाखल आहेत.
संशयितांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव भोसरी पोलिसांनी पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन त्यानंतर अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, पीसीबी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल देवडे , पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली.