पिंपरी : नाशिक फाटा ते खेड या ३२ किलोमीटर लांबीच्या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे. या मार्गावर शहरातील तीन ठिकाणी भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. त्यासह मार्गावर जाण्यासाठी आणि शहरांतर्गत भागात उतरण्यासाठी कुठे रॅम्प असावेत, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महापालिका अधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे.
नाशिक फाटा ते खेड दरम्यान आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर..
पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा (कासारवाडी) ते खेड दरम्यान आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या मार्गाची उभारणी होणार असून, या प्रकल्पासाठी सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संदर्भातील प्रकल्पाची माहिती देण्यासाठी महापालिका भवनात बैठक झाली.
त्यास आमदार महेश लांडगे यांच्यासह महापालिका आयुक्त शेखर सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रोजेक्ट मॅनेजर संजय कदम, महापालिका मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. एलिव्हेटेड मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी आणि महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांमध्ये समन्वय राहण्यासाठी बैठक आयोजित केली होती. अशी माहिती मिळत आहे.
नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये : आमदार लांडगे
नाशिक फाटा ते खेड दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू झाले तर यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी कामाच्या पहिल्या टप्प्यात राजे शिवछत्रपती चौक मोशी प्राधिकरण (स्पाइन रस्ता गोडाऊन चौक), मोशीतील भारतमाता चौक आणि भोसरी येथील प्रस्तावित जंक्शन व सब-वेचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. काम सुरू असताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्या. अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली.
‘या’ ठिकाणी असेल भुयारी मार्ग..
भोसरी, तळवडे, चिखली, मोशी या भागातील वाहतूक सहज आणि सक्षम होण्याच्या दृष्टीने नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड मार्गाच्या खालील रस्त्यावर भुयारी मार्ग आणि ग्रेडसेपरेटरबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच, भोसरीतील भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाजवळ विद्यार्थी-पालकांच्या सुरक्षेसाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाकडे प्रशासनाला केली.
काय होणार फायदे…?
पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होईल.
नाशिक फाटा ते खेड हे सुमारे ३२ किलोमीटर काही मिनिटांत पार करता येईल.
शहरातील तळवडे, चिखली, मोशी, भोसरी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटेल.
प्रस्तावित रिंगरोड कार्यान्वित झाल्यानंतर नगर रस्ता, सोलापूर, सातारा, मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्ग जोडणार.
“नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. या मार्गाच्या शहरातील आराखड्यासंदर्भात, एलिव्हेटेड मार्गावरून शहरांतर्गत भागात जाणे व मार्गावरून खाली उतरणे, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर काय उपाययोजना कराव्यात, याबाबत महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
शेखर सिंह, आयुक्त, महापालिका