पुणे : नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका काय आहे ती सांगतो, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी भुजबळ यांना दिला आहे.आज पुण्यात मनोज जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला यावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज पुण्यातील देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या चरणी मनोज जरांगे पाटील नतमस्तक झाले.
राज्यभर मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यामध्ये सतत शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. अशातच आता छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या संदर्भात पत्रकारांनी जरांगेना प्रश्न विचारला असता जरांगे म्हणाले, मराठा समाजाने राज्यभर कोण-कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो, असं ते म्हणाले. तसेच भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका, असंही मनोज जरांगेंनी म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाले, मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही, किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायच आहे, त्याला नक्कीच पाडेल. सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा काबीज करणार असल्याचे देखील जरांगे पाटील म्हणाले.