पुणे : पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ येथील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवण्यावर ठाम असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी (ता. ३१) स्पष्ट केले आहे. मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते.
महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात कॉंग्रेसचे नेते आले नव्हते मात्र आमची व उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मी गुरुवार आणि शुक्रवार पुण्यात असणार आहे. चिंचवडसाठी आतापर्यंत माझ्याकडे नऊ लोकांनी उमेदवारी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागितली आहे. याबाबत त्यांच्याशी समोरासमोर बोलणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या व आमच्या वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.
कसब्याबाबत कॉंग्रेस तयारी करत असेल कदाचित पाठीमागील विधानसभा झाल्या त्यावेळी आघाडीत (त्यावेळी महाविकास आघाडी नव्हती) ही जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली होती. पुण्यात गेल्यावर माझ्या लोकांशी व कॉंग्रेससह शिवसेना व इतर मित्रपक्षांशी चर्चा करेन असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. चिंचवड व कसबा या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लढवण्यासाठी आम्ही ठाम आहोत असे सांगतानाच कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड देगलूरमध्ये निवडणुका झाल्या आहेत. याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली.
दरम्यान, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवड विधासभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबात चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.