पिंपरी : पिंपरी- चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत बहिणी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाने कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन यादव असं कोयत्याने वार करून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी आरोपीला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गौतम रामानंद यादव उर्फ राय असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. ०५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन यादवचे दीड वर्षांपासून सख्ख्या चुलत बहिणी सोबत प्रेम संबंध होते. हे त्यांच्या कुटुंबाला आवडत नव्हतं. त्यांचा या प्रेम प्रकरणाला विरोध होता. प्रेयसी चुलत बहीण ही कुटुंबाला सोडून सचिन राहत असलेल्या दिघीतील रूम पासून काही अंतरावर राहण्यास गेली होती. यावरून देखील त्यांच्या कुटुंबात रोष निर्माण झाला होता.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गौतमने त्याच्या अल्पवयीन मित्रासह दिघीतील सचिन यादवच्या रूमवर गेला. त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाले आणि याच वादातून गौतमने सचिनवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने सचिनचा मृत्यू झाला. घटनेनंतर गौतम आणि त्याचा अल्पवयीन मित्र फरार झाला होता. काही तासातच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या पथकाने गौतमला काळा खडक तर अल्पवयीन मुलाला मावळ परिसरातून ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.