लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. लोणावळा पोलिसांना गुंगारा देऊन पाच वर्ष फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मतीन रशीद शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मतीन रशीद शेख याच्यावर लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात सन २०१९ मध्ये दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून आरोपी फरार हाेता. मतीन हा लोणावळा रेल्वे मैदान परिसरात येणार असल्याची गुप्त बातमी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या पथकाला आरोपीच्या मागावर पाठवले. त्यानंतर आरोपीची ओळख पटताच लोणावळा रेल्वे मैदान परिसरात पाेलिसांनी सापाला रचून आरोपीला अटक केली. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवालदार बंटी कवडे, पोलिस हवालदार सचिन गायकवाड, पो.कॉ रहिस मुलानी, पो कॉ. गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.