चिंचवड : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच चिंचवड विधानसभेत शरद पवार गटाकडून राहुल कलाटेंनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे. जावेद शेख या त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने हा गुन्हा दाखल केला असल्याचे आता समोर आले आहे.
मी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचं पाहून कलाटे संतापले. ‘आपण एकाच गावातले असताना तू अर्ज का भरतोय, तू वंचितच्या तिकिटावर लढलास तर तुझी खैर नाही.’ अशी धमकी राहुल कलाटेंनी दिल्याचा आरोप जावेद शेख यांनी केला आहे.
वंचितचा एबी फॉर्म असल्याचा दावा..
शेख यांनी त्यांच्याकडे वंचितचा एबी फॉर्म असल्याचा ही दावा केला आहे. तर दुसरीकडे जितेंद्र वाडघरे यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची दावेदारी केली आहे. त्यामुळं घडलेला प्रकारावरून अनेक तर्क-वितर्कही लावले जात आहेत. कारण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्याने 2019 ची विधानसभा आणि पोटनिवडणुक अशा दोन निवडणुका राहुल कलाटे लढलेले आहेत.
तसेच वंचितचे प्रदेश कार्यकारिणीवरील पदाधिकारी अनिल जाधव आणि राहुल कलाटे यांचे जवळचे संबंध आहेत. हेजर बघितलं तर कलाटे यांना वंचितच्या तिकिटावर चिंचवडमध्ये कोण उभं राहणार? याची थोडी फार कल्पना नक्कीच असणार आहे. मात्र चिंचवड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या ग प्रभागात जावेद शेख हे वंचित कडून अर्ज दाखल करत असल्याचं दिसून आलं. त्यावेळी तू इथून कसं काय अर्ज भरतोय? आपण तर एकाच गावातील आहोत, त्यामुळं तू वंचितच्या तिकिटावर लढलास तर तुझी खैर नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप जावेद शेख यांच्याकडून करण्यात आला आहे.
या आरोपबाबत बोलताना कलाटे मात्र हे आरोप खोटे असल्याचा आणि भाजपच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झाल्याचा दावा करत आहेत. माझं शक्तिप्रदर्शन पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनीच हे षडयंत्र केलं आणि सत्तेचा दुरुपयोग करत माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला, असा पलटवार राहुल कलाटे यांनी यावेळी केला आहे.