Income Tax Raid : पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथे इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. आसवानी असोसिएट्स अँड बिल्डर्स या फर्मसह त्यांच्याशी व्यावसायिक संबंधित असलेल्या आणखी काही व्यावसायिक ग्रुपवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापेमारी केली. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवडच्या व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. या छापेमारीत झाडाझडती घ्यायला सुरुवात झाली आहे.इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पुणे विभागाच्या विविध पथकांनी आसवानी ग्रुपच्या विविध कार्यालय आणि निवासस्थानांवर पहाटे सहा वाजता छापा टाकला.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी विविध वाहनांमधून पहाटे आसवानी ग्रुपच्या वेगवेगळ्या कार्यालयाबाहेर दाखल झाले. त्यांनी एकाच वेळी सगळीकडे छापा टाकत कोणालाही सावरण्याची संधी दिली नाही. महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन तात्काळ तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणामध्ये करण्यात आली आहे, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, आसवानी असोसिएट्स आणि बिल्डर्सवर प्राप्तिकर विभागाची रेड पडल्याने खळबळ उडाली आहे.