पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत (आरसीएच) मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या २२ कर्मऱ्यांना महानगरपालिकेत नियमित वेतन श्रेणीमध्ये सामावून घेण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे यशस्वी पाठपुरावा केला आहे.
‘आरसीएच’ अंतर्गत मानधनावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आस्थापनेवर नियमित सेवेत समावून घेण्याबाबत नगर विकास विभागाकडे प्रस्ताव होता. त्याला मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी नवीन पद निर्मिती करून ‘आरसीएच’कार्यक्रमातील मानधनावरील कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून शासनाची मान्यता मिळाल्यामुळे २२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून घेण्यात आले.
माता व बाल मृत्यूचे दर कमी करणे, प्रजनन दर कमी करणे हे उद्दिष्ट घेऊन राज्य शासनाच्या वतीने आरसीएच हा कार्यक्रम राबविला जातो. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २००५ च्या शासन निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्येदेखील प्रजनन व बाल आरोग्य हा कार्यक्रम राबविला जात होता. याच विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याबाबत निर्णय विचाराधीन होता.
सन २०१० पासून या कार्यक्रमासाठी १०० टक्के खर्च पिंपरी-चिंचवड महानगर पालिका करीत आहेत. या कार्यक्रमांतर्गत लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एएनएम, लिपिक या पदावर सध्यस्थितीत एकूण २२ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांमार्फत सर्व आरोग्य विषयक कामे, कार्यक्रमांची प्रसिद्धी, जनजागृती व अंमलबजावणी करण्यात येते. त्यामुळे नागरी भागातील तसेच झोपडपट्टी भागातील नागरीकांचे आरोग्यमान उंचाविण्यास मदत होते. महानगर पालिकेच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ देणाऱ्या योजना राबविण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग उपलब्ध असून, हद्दवाढ तसेच लोकसंख्या वाढीमुळे तातडीच्या कर्मचारी वर्गाची पालिका प्रशासनास नितांत गरज होती.
तसेच, सध्याच्या जागतिक महामारीमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे दि. २६ ऑगस्ट २०२० च्या महापालिका ठराव क्र. ५५६ अनुसार आरसीएच कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणीत सामावून घेण्यास मान्यता दिलेली आहे. महानगरपालिका सभा ठराव, तसेच सदर कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेत प्रदीर्घ काळ केलेल्या कामाचा विचार करून आरसीएच कार्यक्रमांतर्गत असलेल्या एकूण २२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पदनिर्मिती करून नियमित वेतनश्रेणीमध्ये समावून घेण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांनी मानले लांडगे, घोळवे यांचे आभार…
प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत (आरसीएच) कार्यरत असलेल्या या २२ कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायमस्वरूपी करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांनी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच, कामगार नेते आणि माजी उपमहापौर केशव घोळवे यांनीही कामगारांना कायम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आमदार महेश लांडगे आणि माजी उपमहापौर केशव घोळवे यांचे आभार मानले आहेत.