पिंपरी : शिरगाव येथे अवैध दारू वाहतूक तसेच विक्री प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साइज) तळेगाव दाभाडे विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नीलेश ज्ञानेश्वर पवार (वय-३५, रा. गोडुंब्रे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, १२ मे रोजी शिरगाव येथे गहुंजे रस्त्यावर अवैध गावठी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साइजच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून एक संशयित चारचाकी वाहन थांबवले. वाहनामधून ३५ लिटरच्या ८ प्लास्टिक कॅनमध्ये २८० लिटर गावठी दारू जप्त केली. यामध्ये एकूण १ लाख ४८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई एक्साइजचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साइजच्या तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक प्रवीण गाडगे, प्रशांत रुईकर, सहायक दुय्यम निरीक्षक रवि लोखंडे, जवान शिवाजी गळवे, रसूल काद्री, अविनाश दिघे, प्रदीप गवळी, अमोल अन्नदाते यांच्या पथकाने केली.