पिंपरी : भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिपेरिंग सर्किटच्या साह्याने अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता दुसऱ्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफील करणाऱ्या एकावर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई देहूरोड परिसरातील किवळे येथील बालाजी इंटेरियर शॉपच्या मागील मोकळ्या जागेत मंगळवारी (ता. ३०) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई स्वप्नील चंद्रकांत साबळे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कय्युम आबिदअली चौधरी (वय ३७, रा. रावेत, मुळ रा. खरकामासुमपुर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कय्युम चौधरी भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिपेरिंग सर्किटच्या साह्याने अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता दुसऱ्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफील करत असल्याबाबत देहूरोड पोलिसांच्या तपास पथकाला माहिती मिळाली.
दरम्यान, पोलीस, पथकाने किवळे येथील माळवाले नगरमध्ये मोकळ्या जागेत छापा टाकला. त्यावेळी आरोपी घरगुती भरलेल्या सिलेंडरमधून मोकळ्या सिलेंडरमध्ये गॅस रिफिल करताना आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून १२ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.