देहूगाव, (पुणे) : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथासाठी नांदेड येथील शेतकरी निखिल सुरेश कोरडे यांच्या ‘गुलाब-मल्हार’ आणि लोहगावमधील शेतकरी सूरज ज्ञानेश्वर खांदवे यांच्या ‘हिरा-राजा’ या बैलजोडींची निवड करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात सेवा करण्यास मिळणार असल्याबद्दल दोन्ही शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तर चौघडा गाडी ओढण्याचा माण टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या व संद्या जोडी मिळाला आहे.
संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे यांनी ही निवड केली.
सुरज ज्ञानेश्वर खांदवे हे श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेले लोहगाव ता. हवेली. पुणे येथील शेतकरी असून त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा व राजा आहे. त्याचप्रमाणे नांदेड गाव ता. हवेली, पुणे येथील निखिल सुरेश कोरडे हेही शेतकरी असून त्यांनीही आपल्या मल्हार- गुलाब बैलजोडीला पालखी सोहळ्यासाठी संधी मिळावी, यासाठी अर्ज केला होता.
तसेच पालखी रथाच्या पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्यासाठी चिखली टाळगाव या ऐतिहासिक गावातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या नंद्या व संद्या बैलजोडीला मान देण्यात आला आहे, अशी माहिती विशाल महाराज मोरे यांनी दिली.
यंदा २६ शेतकऱ्यांचे अर्ज
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळण्यासाठी दरवर्षी संस्थानकडे अनेक इच्छुक शेतकरी अर्ज करतात. यंदाही संस्थानकडे २६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानुसार, शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संस्थानच्या विश्वस्त मंडळाने बैलजोडीची पाहणी केली. बैलाचा रुबाबदारपणा, त्यांचा रंग व इतर गुण पाहिले. त्यानुसार, संस्थानने देऊळवाड्यात मंगळवारी (ता. ६) अंतिम दोन बैलजोडीची निवड केली. त्यामध्ये कोरडे आणि खांदवे यांच्या बैलजोड्यांचा समावेश होता.
बैलजोडीची निवड कशी केली जाते?
- बैलजोडी मालक शेतकरी असायला हवा.
- मालकांच्या कुटुंबियांची माहिती घेतली जाते.
- कुटुंबीय वारकरी आणि माळकरी असायला हवेत.
- वारीत सक्रिय सहभाग असायला हवा.
- बैलांच्या अनेक जाती आहेत. त्यामध्ये खिल्लार जातीच्या बैलांची निवड केली जाते.
- वशिंडाचा आकार तपासला जातो.
- बैलाचे शिंग सारखे असायला हवेत.
- पायाला किंवा शरीराला कोणतीही दुखापत नसावी.
- साधारण कसलेल्या बैलाला प्राधान्य दिलं जातं.
- गुडघे आणि पायांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसावा.
- पायाची नखं सारखी असावी.