थेरगाव, (पिंपरी): दोन मुली झाल्या पण मुलगा झाला नाही म्हणून पतीने पीडितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना थेरगावमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी २ मार्च ला थेरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी निशिकांत बबन तवंदकर (रा. हातकणंगले, कोल्हापूर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल दादासाहेब शटके (वय ३४ रा. स्वामी समर्थ कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा आरोपीशी १७ जुलै २०१४ रोजी विवाह झाला. मात्र त्यानंतर आरोपीने दारू पिऊन केलेले कर्ज फेडण्यासाठी फिर्यादीच्या बहिणीला माहेराहून पैसे घेऊन येण्यास सांगितले. तसेच फिर्यादीच्या बहिणीला दोन मुली झाल्या. यावेळी त्याने मला मुलगा पाहिजे होता. तू माझ्या वंशाला दिवा दिला नाही म्हणत पीडितेचा शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. त्याच्या या छळाला कंटाळून पीडितने अखेर आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. यावरून वाकड पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.