लोणावळा : चैत्र यात्रेनिमित्त आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यामध्ये आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने कार्ला गडावर येतात. येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शन व्हावे. यासाठी प्रशासनाने जुना पुणे-मुंबई महामार्गावर अवजड वाहनांसाठी तीन दिवस म्हणजे बुधवारपर्यंत (ता.१७) बंद केला आहे.
एकवीरा देवीचा चैत्र पालखी सोहळा सोमवारी (ता.१५) कार्ला गडावर रंगला आहे. पालखी मिरवणुकीची व यात्रेची सर्व तयारी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. आई एकवीरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघर या ठिकाणी आई एकविरेचा भाऊ काळ भैरवनाथ यांचा पालखी मिरवणूक सोहळा पार पडला.
कोकण भागातून येणाऱ्या आई एकवीरा देवीच्या पालख्या या देवघरांमध्ये येऊन काळ भैरवाची भेट घेतली. त्या ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक काढत कार्ला गडावर दुपारनंतर आली. तर आई एकविरा देवीचा मानाचा पालखी मिरवणुकीचा सोहळा सायंकाळी सात वाजता कार्ला गडावर सुरु झाला. कार्ला एकविरा देवीच्या माहेर घरात श्री काळभैरवनाथाचा पालखी सोहळा गावात पार पडला.
लोणावळ्यातील देवघरात एकविरा देवीचा भाऊ काळ भैरवनाथ यांच्या जत्रेची लगबग दिसून आली. आग्री कोळी, बांधव अनेक वेशभूषा परिधान करून देवघरात दाखल झाले होते. यावेळी तळ कोकणातून शेकडो पायी पालख्या भैरवनाथ महाराजांच्या दर्शनाला आई एकविरा देवीच्या माहेरघर येथे आल्या. सोमवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पालखी प्रदक्षिणा पार पडल्यानंतर पालखी मंदिरातच विसावली.
दरम्यान, कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान महामार्गावर कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच येणाऱ्या भाविकांना व पालखी घेऊन येणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी देखील एकविरा देवीच्या गडावर तसेच पायऱ्या मार्गावर व कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.