पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील कासारवाडी पिंपरी गाव फुगेवाडी मोरवाडी, लालटोपी नगर, दापोडी आदी भागातील सखल भागात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात गेली 3 ते 4 दिवस सलग अतिवृष्टी होत आहे, नागरिकांचे दैनंदिनी व्यवहार ठप्प झाले आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरात कासारवाडी, पिंपरी गाव, फुगेवाडी, मोरवाडी, दापोडी, भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. या अशा अस्मानी संकटाच्या वेळी नागरिकांचे प्रचंड हाल झाले, लोकांचे सौंसार उघड्यावर आले, काही भागात घराच्या भिंती ढासळलेल्या आढळून आल्या या सर्व पूरग्रस्त भागाचा नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी पाहणी केली. तसेच तहसीलदारांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नागरिकांना मदत करण्याची मागणी केली आहे.
अतीवृष्टीमुळे विद्युत पुरवठा ही मोठ्या प्रमाणात खंडित झाला असून विद्युत वाहिन्याही उघड्यावर आल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, यावर शासन प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवाव्या. तसेच नागरिकांनी पुढचे काही दिवस सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले.