नवी सांगवी, (पिंपरी) : पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर शुक्रवारी (दि. २४) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मिलिंद भोंडवे (वय – ४०, रा. दारुंब्रे, ता. मावळ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर शुक्रवारी दुपारी क्रिकेटचे सामने सुरू होते. दुपारी एकच्या सुमारास क्रिकेटच्या एका सामन्यात मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथे वास्तव्यास असलेले मिलिंद भोंडवे हा तरुण गोलंदाजी करीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मैदानावर कोसळला.
या वेळी सहकाऱ्यांनी धाव घेत तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या वेळी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात नेले असता शवविच्छेदन तपासणीत डॉक्टरांनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले.
मिलिंद भोंडवे हा तरुण शेतकरी कुटुंबातील असून त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, वहिनी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.