पुणे (पिंपरी) : महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने तिचा खदानीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी खराबवाडी येथे घडली. देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी (वय २७, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत महिला आणि आरोपी देवेंद्रकुमार यांचे २०१० पासून प्रेमसंबंध होते. महिलेचे २०१८ मध्ये लग्न झाले. मात्र, पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी ती माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर तिचे देवेंद्रकुमार याच्यासोबत पुन्हा बोलणे होऊ लागले. दरम्यान, देवेंद्रकुमारची त्याच्या भावाच्या मेहुणीसोबत लग्नाची बोलणी सुरू झाली होती.
ही बाब महिलेला समजली असता तिने ‘लग्न करेन, तर तुझ्यासोबतच करेन, तुझ्यासोबतच राहीन,’ असा तगादा देवेंद्रकुमारकडे लावला. त्यामुळे तिचा खून करण्याचे ठरवून देवेंद्रकुमारने तिला बोलावून घेतले. दुचाकीवरून तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेले. जवळच असलेल्या स्टोन क्रशरमधील खदानीत तिला उंचावरून ढकलून दिले याच्यात तिचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.