पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान काळेवाडी स्मशानभूमी जवळ घडली असून आज (दि.११) सकाळी ती उघडकीस आली आहे.
शिवानी सोमनाथ सुपेकर (वय 27, रा. जगताप नगर, थेरगाव) असं गळा आवळून हत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रियकर विनायक आवळे याने शिवानीची हत्या करून रिक्षात मृतदेह टाकून आईच्या घरासमोर लावून फरार झाला आहे. वाकड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी गेल्या एक- दोन वर्षांपासून विनायक आवळे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावून आरोपी प्रियकर तेथून पसार झाला.
आज (दि.११) सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून फरार प्रियकराचा शोध वाकड पोलिस घेत आहेत.