तळेगाव दाभाडे : पुण्यातील मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील ग्रामपंचायतीच्या पाठीमागे गॅस चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत असताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १७ फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास केली आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेस परशुराम जाधव (वय-४२) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बाबाजी आनंदराव पडवळ (वय-५० रा. दत्त मंदिरासमोर, नवलाख उंब्रे, ता. मावळ) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवलाख उंब्रे ग्रामपंचायत कार्यालयामागील एका गाळ्यात छापा टाकला. त्यावेळी आरोपी बाबाजी पडवळ हे घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिफीलिंग सर्कीटच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आले.
आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानगी शिवाय आणि कोणत्याही सुरक्षिततेशिवाय भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.