पिंपरी-चिंचवड : रुग्णवाहिकेतून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1 कोटी 31 लाखांचा 96 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत कृष्णा शिंदे, अक्षय मोरे, हनुमंत कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे, सन्नीदेवल शर्मा, सन्नीदेवल भारती आणि सौरभ निर्मल या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रावेत पोलीसांच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. या कारावईत त्यांनी कृष्णा शिंदे, अक्षय मोरे आणि हनुमंत कदम यांना ताब्यात घेते होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखवत, त्यांच्याकडून 30 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपींकडून दोन रुग्णवाहिका, चार मोबाईल आणि एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
आरोपींनी देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे यांच्याकडून गांजा आणला. त्यानंतर तो सौरभ निर्मल याला विकणार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवी प्रसादला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 50 लाख 20 हजारांचा 50 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. विविध छापेमारीत एकूण 1 कोटी 31 लाखांचा 96 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजाची रूपीनगर चिखलीत विक्री केली जाणार होती. या गांजा विक्रीत आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.