पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड येथील निगडी परिसरात ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या छाप्यात चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. निगडीतील फोनिक्स ‘स्पा’वर ही कारवाई करण्यात आली आहे. छापा टाकलेल्या फोनिक्स ‘स्पा’ च्या महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दिनेश गुप्ता हा आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, निगडीमध्ये इन्स्पिरिया मॉलमध्ये फोनिक्स नावाने सुरू असलेल्या ‘स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय सुरु होता. या वेश्याव्यवसायाची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फोनिक्स ‘स्पा’मध्ये डमी ग्राहक पाठवला. तिथं वेश्याव्यवसाय केला जातो का? याची शहानिशा पोलिसांनी केली.
त्यानंतर पोलिसांनी ‘स्पा’वर छापा टाकण्यात आला. या छाप्यात चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं असून तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. याप्रकरणी महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून फरार आरोपी दिनेश गुप्ताचा पोलिस शोध घेत आहेत.