सासवड : सासवड (ता. पुरंदर) येथील फळबाजारात चिखलामुळे राडारोडा झाला आहे. शेतकरी या बाजारातून धड चालूही शकत नाहीत. त्यातच व्यापाऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याने शेतकरीवर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तरकारी बाजार संत सोपानदेव मंदिरानजीक भरतो. फळबाजार न्यायालयासमोरच्या मोकळ्या जागेत भरविला जातो. परंतु, सखल भागात पाणी साठून सर्वत्र चिखल झाला आहे. त्यातच हा बाजार सुरू आहे. चिखलात कसेबसे उभे राहून शेतकरी आपला माल विकत आहेत. दुसरीकडे येथील गैरसोयींमुळे व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
पुरंदर तालुक्यात अंजीर, सीताफळ, पेरू, डाळिंब या सासवड नगरपरिषदेकडून दुर्लक्ष फळांचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. इथल्या हवामानात अंजीर, सीताफळ, वाटाण्याला वेगळीच गोडी असते. शेतकरी स्थानिक सासवड, वाघापूर, चौफुला, दिवे येथील बाजारपेठेत कुठल्याही प्रकारचा खर्च नसल्याने स्वतःचा माल स्वतः विकतात. चार पैसे जास्त मिळत असल्याने स्थानिक बाजारपेठेलाच शेतकरी प्राधान्य देतात. सासवड नगरपरिषदेकडून शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा देण्यात येत नाहीत. बसण्यासाठी पुरेशी जागा नाही.
अगदी उभे राहून माल विक्री करायचे म्हटले तरी संपूर्ण परिसरात चिखल आहे. वजन करण्यासाठी अधिकृत वजन काटा नाही. शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही. वाहनतळाची व्यवस्था नाही. एवढ्या गैरसोयी असताना वसुली एजंट शेतकऱ्यांकडून वसुली का करीत आहेत? तसेच ज्या जागेत बाजार भरविला जातो ती जागा नगरपरिषदेची असेल तर मग बेकायदेशीर वसुली कशासाठी?
पुरंदर वर्षानुवर्षे हा बाजार भरतो. लाखो रुपयांची उलाढाल होते. ग्राहकदेखील दूरवरून खरेदीसाठी येतात. मात्र, आजपर्यंत हक्काची बाजारपेठ येथे उपलब्ध झालेली नाही. मधल्या काळात सासवड बाजारपेठेत सुसज्ज शेड उभारण्यात आले. मात्र, जागा अपुरी पडू लागल्याने बाजार शहराबाहेर नेण्यात आला. त्या ठिकाणी सध्या किरकोळ विक्री सुरू आहे.
– दिलीप गिरमे, अध्यक्ष शेतकरी संघटना