पिंपरी : हिंजवडीतील इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. संशयित ऋषभ निगम याने मित्राकडून पिस्तूल घेऊन वंदनाची हत्या केली आहे. त्याच्या मित्रानेदेखील प्रेयसीचा गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. वंदना के. द्विवेदी (२६) असे खून झालेल्या इंजिनिअर तरुणीच नाव आहे. याप्रकरणी ऋषभ राजेश निगम (रा. लखनऊ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
म्हणून घेतला मित्राकडून पिस्तुल
रिअल इस्टेट ब्रोकर असलेल्या ऋषभ याला स्वत:चा व्यवसायात दबदबा निर्माण करायचा होता. त्यासाठी त्याने त्याचा जुना मित्र असलेल्या एका तरुणाकडून २०१५-१६ मध्ये पिस्तूल घेतले होते. दरम्यान, ऋषभ हा वंदना हिच्या घराशेजारी रहायला होता. त्यावेळी वंदना महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिचे आणि ऋषभ यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्यांच्यात भेटीगाठी वाढल्या होत्या.
मित्रानेही प्रेयसीचा केला होता खून
ऋषभ याच्या मित्राचेही एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, २०१८-१९ मध्ये मित्र आणि त्याच्या प्रेयसीत वाद सुरु होते. त्यातून मित्राने त्याच्या प्रेयसीवर गोळ्या झाडून तिचा खून केला. तसेच स्वत: लादेखील गोळी मारून घेत आत्महत्या केली होती. दरम्यान, वंदना ही नोकरीनिमित्त पुण्यातील हिंजवडी येथे आली होती. तसेच ती आपल्याला टाळत आहे, असं ऋषभ याला वाटत होते. त्यातून गेल्या ३-४ वर्षांपासून त्यांच्यात सतत वाद होत असायचे. याचाच राग मनात धरून मित्राने ज्याप्रमाणे थंड डोक्याने प्रेयसीचे आणि स्वत:चे जीवन संपवले त्याचप्रमाणे ऋषभ याने देखील संशयातून आपल्या प्रेयसीला संपवले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.