पिंपरी : खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागात वनवासी बांधवाच्या वाड्या , वस्त्या आहेत . तेथील मुलांची शिक्षणाची सोय व्हावी या करिता सुरू केलेल्या वनवासी विद्यार्थी वसतीगृहातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी मदत करण्याचा संकल्प भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते डॉ. दीक्षित यांनी १९७१ साली वाडा , ता.खेड याठिकाणी वसतिगृह सुरू केले. त्यानंतर वाडा गाव धरणक्षेत्रात गेल्याने वसतिगृहाचे राजगुरूनगर येथे स्थलांतर करण्यात आले. येथील तात्या खेडकर यांनी नदी काठच्या राम मंदिराची जागा वसतीगृहासाठी उपलब्ध करून दिली. परंतु, त्या ठिकाणी मुलांची निवास परिस्थिती तसेच पुराच्या पाण्याची भीती याकरिता संस्थेने राजगुरूनगर येथे वाडा रोड ला १२ गुंठे जागा घेऊन सुसज्ज इमारत उभी केली. सध्या २००९ पासून वसतिगृह याठिकाणी सुरू आहे, अशी माहिती वसतिगृहाचे अधीक्षक अमोल डमरे यांनी दिली.
दरम्यान, देशाच्या राष्ट्रपतीपदी पहिल्या आदिवासी महिला म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जीवनावश्यक वस्तू आणि शालेयपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. तसेच, आगामी काळात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी मदत करण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला. त्यामुळे संस्थेच्या कामाला आणखी गती मिळेल, असा विश्वासही अधीक्षक डमरे यांनी व्यक्त केला.
आदिवासी विद्यार्थ्यांची मोफत सुविधा…
सध्यस्थितीला वसतिगृहात इयत्ता ५ वी ते १० पर्यंत चे एकूण ५० मुले शिक्षण घेत आहेत . या भागातील वनवासी मुले सुशिक्षित , सुसंस्कृत नागरिक व्हावीत हाच वसतीगृह सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश होता. हे वसतिगृह नसून हे एक हिंदू जीवन पद्धतीचे यथार्थ दर्शन घडवणारे गुरुकुल आहे. या ठिकाणी विध्यार्थ्यांना ज्ञानार्जना बरोबरच उत्तम संस्कार, योगासने, प्राणायाम, संगणक शिक्षण दिले जाते. मुलांना सर्व गोष्टी मोफत पुरवल्या जातात. वसतीगृहात वेगवेगळे सण समारंभ साजरे केले जातात. या बरोबरच मुलांना क्रांतिकारक, समाजसुधारक यांची चरित्रे सांगीतली जातात. वसतीगृहात विद्यार्थ्यांचा निकाल दरवर्षी १००टक्के असतो. तसेच विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी अभ्यासाबरोबरच योगा व प्राणायाम शिकवले जाते.
राज्यशासन स्तरावर मदतीची अपेक्षा…
सन १९७१ साली सुरू केलेला हा सामाजिक प्रकल्प पुणे जिल्ह्यातील आदर्श प्रकल्प म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक शासकीय अधिकारी आपले वसतीगृह (मॉडेल वसतीगृह) म्हणून दाखवण्यासाठी अनेक मान्यवरांना घेऊन येत असतात. सर्व ट्रस्टी हे सामाजिक बांधिलकी म्हणून येथे कार्य करतात. कोणताही मोबदला ट्रस्टी घेत नाहीत. मात्र, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून पोषण आहाराव्यतिरिक्त कोणतीही मदत राज्य सरकारकडून होत नाही. वंचित, शोषित आणि दुर्लक्षीत आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या कार्यात योगदान देणारी ही अनेकांच्या सढळ मदतीने हा वृक्ष दिमाखात उभा आहे. आपणही या कार्यास हातभार लावावा. त्यासाठी वसतिगृहाचे अधीक्षक अमोल डमरे यांच्याशी 94221995881संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.