पिंपरी : बनावट कागदपत्रांसह बेकायदा राहणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भोसरीतील शांतीनगर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पारपत्र मिळून आले आहे. भोसरी येथील शांतीनगरमध्ये शनिवारी २५ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. पिंपरी-चिंचवड शहरात बांगलादेशी घुसखोरांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही शहरात पुन्हा बांगलादेशी घुसखोर मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शामीम नुरोल राणा (वय-२६), राज उर्फ सम्राट सदन अधिकारी (वय-२७) जलील नुरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय-३८), वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीजऊल हक हिरा (वय-२६) आणि आझाद शमशुल शेख उर्फ मोहंमद अबुल कलाम शमशुद्दिन फकीर (वय-३२) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना राहत होते. ते दोन्ही देशांच्या सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने आले. बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पारपत्र बनवून शांतीनगर येथे भारतीय नागरिक असल्याचे भासवून ते राहत होते.
शांतीनगर येथील ओम क्रिएटीव्ह टेलर्स या कंपनीत ते काम करीत होते. याबाबत दहशतविरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी छापा टाकून पाचही बांगलादेशींना अटक केली आहे.
दरम्यान, आरोपींना पिंपरीतील नेहरुनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास फौजदार केंद्रे करत आहेत.