पुणे : पुण्यातील चर्चेतील पोटनिवडणुक कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल यांना प्रदेश प्रवक्तेपदी नेमल्याने कसब्याच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळणार, हे निश्चित झालं होतं. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचा दावा करणाऱ्या भाजपकडेच पाचहून अधिक इच्छुक उमेदवार होते.
मात्र पुण्यातील नेत्यांच्या बैठकीनंतर मुंबईतही राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये खलबतं झाली आणि हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
दरम्यान, चिंचवडमध्ये जगताप कुटुंबातून कुणाला संधी दिली जाणार यााबबत चर्चा सुरू असताना भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव उमेदवारीसाठी निश्चित केलं आहे.