पिंपरी : कॅम्प परिसरातील तळ्याजवळील रस्त्याच्या कडेला उभे रहायचे असेल तर आम्हाला हप्ता द्या, हा आमचा परिसर आहे, अशी धमकी देवून मोबदला म्हणून तृतीयपंथीयांकडून एक लाख १२ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली.
याप्रकरणी नंदकिशोर उर्फ नंदिनी ज्ञानेश्वर पेढेकर (वय ३०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश उर्फ बाळा प्रमोद शेडे (वय २७), अमित मुरलीधर पवार (वय २८), अजय महादेव भंडलकर (वय २३), आकाश विजय कुडालकर (वय २०) आणि निशांत बसंतराज गायकवाड (वय २८, सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तळेगावातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्प येथील तळ्याजवळ रस्त्याच्या कडेला नंदिनी आणि त्यांच्या दोन मैत्रिणी थांबत होत्या. जानेवारी महिन्यात फिर्यादी मैत्रिणींसह त्याच ठिकाणी थांबल्या असता आरोपी प्रकाश व अमित हे दोघेही तिथे आले. फिर्यादींना त्यांनी शिवीगाळ केली. तुम्हाला येथे उभे राहायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यायचा, हा आमचा परिसर आहे, अशी धमकी दिली व त्यांच्याकडून हप्ता घेण्यास सुरुवात केली.
हप्त्याचे पैसे वाढवून दिले नाही तर महाग पडेल. तुमच्या बापाची जागा नाही. पैसे दिले तरच येथे थांबायचे, अशी धमकी देत अपशब्द वापरले. हा प्रकार ५ नोव्हेंबर रोजी पुन्हा घडला. आरोपींनी वारंवार पैशांची मागणी केली. आरोपींच्या धमक्यांना घाबरून फिर्यादीने जानेवारीपासून ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत एक लाख १२ हजार ५०० रुपये हप्ता स्वरुपात रोख, ऑनलाइन माध्यमातून आरोपींना दिले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.