पवनानगर, (पुणे) : पुण्यातील मावळ तालुक्यातील फांगणे गावच्या हद्दीत पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीतील इंजिनिअर युवकाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंजिनिअर अखिलेश उपाध्याय (वय. २५, रा फेज. १ लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे. मुळ राहणार पानिपत, हरियाणा) असं पवनाधरणाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. ही घटना आज २५ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फांगणे गावच्या हद्दीत घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीतील पाच मित्रमैत्रिणी पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. यावेळी पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी पाचही मित्रमैत्रिणी पाण्यात उतरले होते. यावेळी पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यामधील इंजिनिअर अखिलेश उपाध्याय याचा पवनाधरणाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाला. मित्रमैत्रिणीने आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांना यश आले नाही. लोणावळा ग्रामीणचे पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढला आहे.
यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले, जय पवार, नितीन कडाळे, भिमराव वांळुज यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने मृतदेह दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला आहे. त्यानंतर श्छेवदानासाठी खंडाळा येथे पाठवण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस तपास जय पवार करत आहेत.