पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रिकेट खेळताना एका इंजिनियर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिजीत गोवर्धन चौधरी (वय-31, रा. रूपीनगर, तळवडे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव होतं.
नेमकं काय घडलं?
अभिजित हा अभियंता आहे. ते कंपनीतील आपल्या मित्रांसोबत शनिवारी क्रिकेट खेळण्यासाठी प्राधिकरणात गेले होते. मात्र, मैदानावर खेळत असताना अचानक चक्कर येऊन तो खाली पडल्याने सकाळी सव्वानऊ वाजता त्याला निगडीतील लोकमान्य रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उपचारापूर्वीच अभिजीत याचा मृत्यू झाल्याने सकाळी दहा वाजता रुग्णालयाने निगडी पोलिसांना कळविले.
निगडी पोलिसांनी आपल्या हद्दीत हा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं अन् पंचनामा करण्यास नकार दिला. त्यानंतर रावेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देत त्यांच्याकडे देखील ही हद्द येत नसल्याचं नातेवाइकांना म्हणत निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचं सांगितले. त्यामुळे नातेवाईक पुन्हा निगडी पोलिसांकडे पंचनाम्यासाठी गेले असता निगडी पोलिसांनी पुन्हा सदरची हद्द रावेतमध्ये येत असल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी हात झटकल्यानंतर शेवटी राजकीय हस्तक्षेप झाल्यावर वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या आदेशावरून रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे हे स्वतः घटनास्थळी गेले. ती हद्द निगडीची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे अखेर दुपारी दोन वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.