-संगीता कांबळे
पिंपरी : बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर काय करावे हे कळत नव्हते. त्याचवेळी सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाचा डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन संदर्भात मला माहिती मिळाली. यासाठी हा निवासी अभ्यासक्रम माझ्याकरीता एक सुवर्णसंधी आहे. अतिशय सुंदर कॅम्पस आणि सतत सहकार्य करणारे ट्रेनर्स, आम्हाला उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामावर शिकण्याची मिळणारी संधी यामुळे मला खात्री आहे हा डिप्लोमा पूर्ण करून मी माझ्या कुटुंबियांकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. मला ही संधी दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मी खूप आभारी आहे, असे मनोगत सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठात डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ किवळे यांच्या वतीने एक वर्षांपूर्वी गरजू मुलीं करिता दोन प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस सुरु करण्यात आलेले आहेत. हे डिप्लोमा कोर्सेस पूर्णपणे मोफत व निवासी असून दहावी व बारावी पीसीएम केलेल्या मुली यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हा दहावी नंतरचा डिप्लोमा आहे तर डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन हा बारावी नंतरचा डिप्लोमा आहे. मागच्या वर्षी प्रवेश घेतलेल्या मुली सध्या चाकण मधील एका कंपनीमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग घेत आहेत, एवढेच नाही तर त्यांना ट्रेनिंगमध्ये स्टायपेंडही मिळत आहे.
हे डिप्लोमा कोर्सेस सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ किवळे येथे चालवले जात असून कोर्सेस जर्मन ड्युअल मोडच्या पद्धतीप्रमाणे शिकवले जात आहेत. यामध्ये जास्तीत जास्त वेळ मुलींना प्रॅक्टिकल व ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये घालवता येतो. चाकण व पिंपरी चिंचवड मधील विविध कंपन्या या मुलींना इंटर्नशिप व फायनल प्लेसमेंट देण्यास उत्सुक आहेत. सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाने अशा प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस पाच वर्षांपूर्वी सुरू केलेले होते व आत्तापर्यंत शेकडो मुली या डिप्लोमा करून विविध कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. जास्तीत जास्त मुली मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन व वाहन उद्योगांमध्ये रोजगारासाठी तयार व्हाव्यात जेणेकरून या उद्योगांमध्ये स्त्रियांची भागीदारी वाढेल, हा या डिप्लोमा मागचा हेतू आहे.
दरवर्षी या डिप्लोमा कोर्सेस मध्ये शेकडो मुली प्रवेश घेतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या मुली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग व राहण्या खाण्याचा खर्चाचा भार उचलत आहे. जेणेकरून या भागातील मुली सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग व वाहन उद्योगांमध्ये रोजगार क्षम बनवून आपल्या कुटुंबीयांना मदत सुरू करण्यासाठी सक्षम होतील. या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून 30 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामध्ये, सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ किवळे येथेही मुलींना याबाबत सविस्तर माहिती मिळू शकते.
गरजू विद्यार्थीनींना निर्माण होईल विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडविण्याची संधी
गरजू विद्यार्थींनींसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत शिकण्याची जिद्द, आकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थीनी कुशल बनतील आणि त्यातून त्यांच्या सक्षमीकरणास मदत होईल. याद्वारे त्यांना विविध क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडविण्याची संधी मिळेल आणि नेतृत्व करण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये निर्माण होईल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाहद्दीतील 10 वी उत्तीर्ण आणि 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या गरजू मुलींना महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत, कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी सोबत मिळून विद्यार्थ्यांना विविध पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मोफत कौशल्य प्रशिक्षण प्रदान करत आहे. समाजातील सर्व स्तरातील घटकांपर्यंत कौशल्य अभ्यासक्रम पोहचविण्याच्या उद्दिष्टांसाठी आणि कौशल्य शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्वपुर्ण ठरणार आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका“एक सक्षम मुलगी हीच एक सक्षम समाज घडवू शकते, याच कारणाने आम्ही हे दोन वर्षांचे डिप्लोमा कोर्सेस दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकांमधून येणाऱ्या मुलींकरिता चालवतो. आत्तापर्यंत विविध कंपनी या डिप्लोमा या मुलींच्या खर्चाचा भार उचलत होत्या. मागच्या वर्षीपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा महानगरपालिका हद्दीतील मुलींच्या खर्चाचा भार उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. मला खात्री आहे की या उपक्रमामुळे अधिकाधिक मुली मॅन्युफॅक्चरिंग व वाहन उद्योगांमध्ये सहभागी होतील.
– डॉ. स्वाती मुजुमदार, प्रकुलपती, सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे, पण घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची ही उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. येथील सोयीसुविधा, नेहमी पाठिशी उभे राहणाऱ्या शिक्षकांमुळे आमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे, याची आम्हाला खात्री वाटते. आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महापालिकेचे आम्ही आभार मानतो.
– पल्लवी शिंदे, विद्यार्थिनी, सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठआर्थिक अडचणी प्रतिभाशाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा आणत नाहीत याचे उत्तम उदाहरण महापालिका आणि सिंबायोसिस स्कील युनिव्हर्सिटीने सगळ्यांसमोर ठेवले आहे. महिलांसाठी रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्याचे मार्ग तयार करण्याची वचनबद्धता यातून दिसून येते. डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशनसारखे कोर्सेस आम्हाला केवळ तांत्रिक कौशल्यांनीच सुसज्ज करत नाहीत तर पुरुषप्रधान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आत्मविश्वास देखील निर्माण करतात. भारताच्या उत्पादन क्षेत्रात आणि त्यापुढील काळात स्त्रिया महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या भविष्याला आकार देण्यासाठी यासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरू शकतात.
– स्नेहा चव्हाण, विद्यार्थिनी, सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ