पुणे : PMRDA News – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील (PMRDA) वाल्हेकरवाडी (पेठ क्र. ३०, चिंचवड) येथील सुविधा खरेदी केंद्रामधील (Convenience Shopping Centre) २० दुकानांचे ई-लिलाव होणार आहेत. अशी माहिती पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त बन्सी गवळी यांनी दिली आहे. (PMRDA News)
वाल्हेकरवाडी येथील सुविधा खरेदी केंद्रामधील २० वाणिज्य दुकानांचे ई-लिलाव
वाल्हेकरवाडी येथील सुविधा खरेदी केंद्रामधील (Convenience Shopping Centre) एकूण ३१ दुकानांपैकी ११ दुकानांकरीता दि. ०५/०१/२०२३ रोजी ई-लिलाव प्रक्रीया पार पडली होती. त्यातील आता, उर्वरीत खालील २० वाणिज्य दुकानांचे ८० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यासाठी ई-लिलाव प्रक्रीया राबविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
या २० वाणिज्य दुकानांचे दि. ११ मे २०२३ पर्यंत होणाऱ्या ई-लिलावाद्वारे भाडेपट्ट्याने वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक लिलावधारकांना शासनाच्या https://eauction.gov.in या संकेतस्थळावरुन दि. २७ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासूस ते दि. २६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल.
दरम्यान, सदर लिलावाची संपूर्ण प्रकीया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सर्व लिलाव प्रक्रीयेची संपूर्ण माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (https://pmrda.gov.in) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण लिलाव प्रक्रीया https://eauction.gov.in या संकेतस्थळावरुन होईल. त्यासाठी इच्छुक व्यक्तींनी लिलाव प्रक्रीयेत सहभाग घ्यावा. असे आवाहन प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.