जनार्दन दांडगे
पुणे : शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व ओला कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडत आहेत.
सोबतच वीजयंत्रणेला आग लागण्याची शक्यता आहे. वानवडी स्मशानभूमीजवळ महावितरणचे रोहित्र व फिडर पिलरजवळ टाकलेला कचरा पेटल्याने वानवडीच्या भागात शुक्रवारी (दि. ६) रात्री ७.३० च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. ही आग विझवून वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली व वीजपुरवठा सुरळीत झाला.
वीजयंत्रणेला आग लागल्याने किंवा नादुरुस्त झाल्यामुळे वीजपुरवठाही खंडित होण्याचे प्रकार दिसून येत आहेत. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी वीजयंत्रणेजवळ टाकलेला कचरा पेटवून देण्याचे किंवा त्यामध्ये आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषतः ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचऱ्याचा ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे.
महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कंपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्य पदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत.
दरम्यान, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे. वीजयंत्रणेच्या परिसरात रोहित्राच्या आजूबाजूला तसेच फिडर पिलरजवळ ओला व सुका कचरा टाकू नये.
कचरा पेटल्यामुळे वीजयंत्रणेला आगीचा धोका असल्याचे लक्षात येताच २४ तास सुरु असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.